लोकसभा निवडणुकीतील निर्भेळ यशानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या गावात म्हणजेच काटेवाडीत पहिल्यांदाच पाऊल ठेवले. यावेळी त्यांनी ‘जनसंवाद’ कार्यक्रमाद्वारे गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देश, राज्य आणि स्थानिक पातळीवरील कारखान्याच्या निवडणुकीला देखील स्पर्श केला.
पैशांची देवाणघेवाण खूप झाली असं ऐकलंय, खरंय काय?
बारामती लोकसभेच्या निवडणुकीत पैशांची देवाणघेणाण खूपच झाली, अशी चर्चा मी ऐकली आहे, असे म्हणत सभेला उपस्थित नागरिकांनाच त्यांनी मी ऐकले ते खरे आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर समोरूनही होय पैशाची वारेमाप देवाणघेवाण झाली, असे उत्तर मिळाले. त्यावर-त्यांच्याकडे गेलेले आपलेच असते, त्यामुळे तो भाग सोडून द्या, अशी टोलेबाजी करून शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
इथल्या सर्वसामान्य जनतेमुळे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकली
निवडणुका संपल्या आहेत, मागच्या गोष्टी आता काढायच्या नाहीत. आता आपण आपले काम करायचे. या देशातली लोकशाही संपवून इथे हुकूमशाही आणायचा प्रयत्न केला तो तुम्ही लोकांनी यशस्वी होऊ दिला नाही. कारण या देशातले लोक राजकारण्यांपेक्षा अधिक शहाणे आहेत. तुमच्या शहाणपणामुळे या देशातली लोकशाही टिकली आहे. जगात भारताच्या लोकशाहीचा नावलौकिक झाला, हे सर्वसामान्य लोकांमुळे झाले, असे पवार म्हणाले.
खासदार सुनेत्रा पवारांचे बारामतीत बॅनर, शरद पवार म्हणाले, निवडून कोण आले हे महत्त्वाचे!
सुनेत्रा पवार राज्यसभेवर निवडून गेल्यावर बारामतीत त्यांचे खूपसारे फलक लागले आहेत. हाच धागा पकडून पवार म्हणाले, मला कोणीतरी सांगितले की गावागावात त्यांचेच फलक दिसत आहेत. त्यांना मी म्हणालो त्यांचे फलक आणि आपले यश…. निवडून कोण आले हे महत्त्वाचे आहे. आपण बाकी गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही.
काहीही झाले तरी विधानसभेला आपल्या विचारांचे सरकार आणायचे
काहीही झाले तरी महाराष्ट्रामध्ये आता बदल करायचा आहे. यावर्षी महाराष्ट्रात आपल्या विचाराचे राज्य आणायचे आहे.स्वच्छ आणि चारित्र्यवान राजकारणाची नव्याने सुरुवात करायची आहे. या निवडणुकीमध्ये चांगल्या राजकारणाची सुरुवात तुम्ही लोकांनी केली असून महिलांनीही आपले काम यशस्वीपणे केले आहे. आता मी तुमच्यासोबत आहे, एकदिलाने लढाईला उतरू, असे पवार म्हणाले.
छत्रपती कारखान्याची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे
शरद पवार यांनी शेजारच्या छत्रपती कारखान्याचा मुद्दा काढला आणि छत्रपती कारखान्याचा कारभार दुरुस्त करायचा आहे, त्यासाठी निवडणुकीत भाग घ्यायचा आणि निवडणूक जिंकायची असा आशावादही कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.