जलस्रोतांशी खेळ अंगाशी आला, अशास्त्रीय बांधकामामुळे ४५ टक्के जलस्रोतांवर संक्रांत, प्रशासनाची डोळेझाक

प्रतिनिधी, पुणे/येरवडा : धानोरी, वाघोली, येरवडा भागात गेल्या तीस वर्षांत वेगाने झालेल्या शहरीकरणादरम्यान नैसर्गिक जलस्रोत, भूमिगत झरे आणि नाल्यांच्या मार्गाचा विचार झाला नसल्याने या भागातील ‘फ्लॅश फ्लड’चे प्रमाण वाढले आहे. अशास्त्रीय बांधकामामुळे या भागातील ४५ टक्के लहान मोठे जलस्रोत गायब झाल्याची माहिती पुढे आली आहे. चौकाचौकात साठणारे पाण्यामागे मुसळधार पाऊस हे एकमेव कारण नसून, जलस्रोतांच्या नैसर्गिक प्रवाहांना लावलेला धक्का पुराला आमंत्रण देतो आहे.धानोरी, वाघोली, येरवडा भागात मंगळवारी पडलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, संरक्षक भिंती कोसळल्या, मुख्य रस्त्यांवर साठलेल्या पाण्यामुळे काही भागात वाहनेही वाहून गेली. मात्र, मुसळधार पावसामुळे पूर आला नसून, पावसाचे पाणी निचरा होण्यास, वाहून जाण्यासाठीचे मार्ग बंद केल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठून राहिल्याचा दावा अभ्यासक करत आहेत.

Nashik Road : खड्डेच खड्डे! पहिल्या पावसातच नाशिक तुंबणार, पूर्वपावसाळी कामे करण्यात यंत्रणा अपयशी

भूगोल अभ्यासक श्रीकांत गबाले यांनी ‘इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन ऑन जिओग्राफिक इन्व्हायर्नमेंट ऑफ पुणे अँड सराउंडिग’ या विषयावर केलेल्या संशोधनातून पुण्यामध्ये तीन दशकांत तीनशेहून अधिक लहान-मोठे जलस्रोत बुजवल्याचे वास्तव मांडले आहे. या भागात १९९१मध्ये नोंदवल्या गेलेल्या ९८ जलस्रोतांपैकी ३७ जलस्रोत बुजविण्यात आल्याचे अभ्यासातून दिसते आहे.

जलस्रोत बुजवल्याचे दृश्यपरिणाम आता नागरिकांना पावसाळ्यात दिसायला सुरुवात झाली आहे. चार वर्षांत प्रत्येक वेळी मुसळधार, जोरदार पाऊस पडल्यावर नागरिक पूरसदृश परिस्थितीचा सामना करत आहेत. पूर्वी आमच्या भागात कधी एवढे पाणी साठत नव्हते; अलीकडेच ही परिस्थिती उद्भवल्याचे त्या भागात वर्षानुवर्षे राहणारे लोक सांगत आहेत.

वाघोली, धानोरी, विश्रांतवाडी, विमाननगर, सुभाषनगर, आनंदपार्क, टिंगरेनगर, मुंजाबा वस्ती, संतनगर, लोहगाव, येरवडा या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहे. ही कामे करताना नाले, ओढे आणि नैसर्गिक झऱ्यांवर सोयीस्कररित्या भराव टाकले आहेत. खासगी उद्याने, पार्किंग, इमारतींची सुरक्षाभिंत, रस्त्यांसाठी जलस्रोत बुजवले आहेत; तर काही ठिकाणी त्यांची लांबी, रुंदी कमी केली आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी नाले सोयीस्कररित्या वळवले आहेत.

पाणी साठण्याची प्रमुख कारणे

– नाल्यांची रुंदी कमी केली

– नाले-ओढ्यांचे मार्ग सोयीस्कररित्या बदलले

– उताराच्या मार्गावर नाल्याचा प्रवाह अडवला

– राडारोडा टाकून प्रवाहात अडथळे निर्माण केले

– नाल्यात सर्व प्रकारचा कचरा फेकला जातो

– नैसर्गिक झरे, जलस्रोत बुजवले

– डोंगर माथ्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या मार्गात बांधकामे

पावसाळ्यापूर्वी सफाई आठवते

महापालिकेने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या आकाराच्या वाहिन्या अनेक भागात टाकल्या आहेत; पण त्यांची नियमित साफसफाई केली जात नाही. मयूर किलबिल सोसायटी पुढे उघड्यावरून वाहणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर दगडे पडली आहेत. काही ठिकाणी दिवसाढवळ्या कचरा फेकला जातो. पावसाळा जवळ आला की नाल्याच्या स्वच्छतेची कामे हाती घेतली जातात. ती कामे व्यवस्थित होत नाही. नाल्यातून काढलेला कचरा, राडारोडा कडेलाच पडलेला दिसतो आणि पावसात तो पुन्हा पाण्यात मिसळतो. याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

धानोरी भागात अनेकांनी नैसर्गिक नाल्यात राडारोडा टाकून पात्र अरुंद केले आहे. काहींनी पावसाचे वाहून जाणाऱ्या मार्गात अतिक्रमणे करून अडथळे निर्माण केली आहेत. पालिकेकडून तातडीने अशा ठिकाणांची पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेकडून तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

– दिनकर गोजारे,

अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण विभाग, पुणे महापालिका