शरद पवार पुन्हा वरचढ ठरले
शरद पवार पुन्हा एकदा पुतण्यावर वरचढ ठरले आहेत. त्यांनी राज्यात १० जागा लढवल्या आणि त्यापैकी ८ जागांवर त्यांनी विजय मिळवला. दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या आणि फक्त एकच जागा जिंकली. ज्या जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यात बारामतीचाही समावेश होता, जिथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार होत्या. सुप्रिया सुळेंनी त्यांचा मोठा मताधिक्क्याने पराभव केला.
अजित पवार गट पुन्हा शरद पवारांकडे परतणार?
अजितदादांची गतकाळातील चढाओढ आणि बंडखोरी लक्षात घेता ते पुन्हा शरद पवार गटात परतण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होत आहे. यासाठी त्यांचे आमदार मोठ्या संख्येने प्रयत्न करू शकतात, असंही मानले जात आहे. जर असं झालं तर शरद पवार त्यांना पुन्हा स्विकारतात की नाही हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.
पवारांच्या तुलनेत अजित पवार कमी पडले
सध्या अजित पवारांकडे खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. सहा प्रमुख पक्षांमधील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या लढतीत अजितदादाच्या पक्षाची कामगिरी सर्वात वाइट होती. त्यांनी फक्त १ जागा जिंकली आहे. तर पवारांच्या पक्षाने इतरांच्या तुलनेत सर्वात कमी मतदारसंघात निवडणूक लढवली असली, तरी त्यांनी १० जागा लढवून ७ जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निकालाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकांवरही दिसून येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या विजयाची शक्यता तशी कमीच आहे.
राष्ट्रवादीचे नेते (शरदचंद्र पवार) आणि शरद पवार यांचे सहकारी अंकुश काकडे यांनी अजित पवारांवर टीका करत म्हटलं की, ‘पवार साहेबांना सोडून भाजपशी युती करणे हे मतदारांना काही मान्य झालं नाही, अजित पवारांनी प्रचारसभांमध्ये पवार साहेबांवर ज्या प्रकारे निशाणा साधला ते लोकांना आवडलेलं नाही. जर राष्ट्रवादी एकत्र असती तर कदाचित सुप्रिया सुळे यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला असता. पण, अजित पवार शरद पवारांवर ज्याप्रकारे टीका करत होते ते बारामतीकरांना पटलं नाही आणि त्यांनी सुप्रिया सुळेंना मतदान केले.’
अजित पवार मुख्यमंत्री होणार?
आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जर फडणवीस राज्यातील राजकारणातून बाजूला झाले तर अजित पवार महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री होऊ शकतात. शिंदेंच्या पक्षालाही या निवडणुकीत तसा फारसा काही करिष्मा दाखवता आलेला नाही. ते फक्त सात जागा जिंकले आहेत. शिंदे हे जरी मराठा असले तरी त्यांचा आवाका हा फक्त ठाणे-कल्याण भागापुरता मर्यादित आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले की, ‘महाआघाडीचे नेतृत्व करण्याचा करिष्मा हा शिंदेंकडे नाही. विधानसभा निवडणुकीत अजित पवारच विजय मिळवून देऊ शकतात’. मात्र, त्यांच्या खात्यात एकच जागा असल्याने अजित पवार यांची मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री चेहरा म्हणून निवड होण्याची शक्यता फारच कमी आहे.