मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या आकड्यांनुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी ८ पर्यंत शहरात ७.८४ एमएम, पूर्व उपनगरात १२.७७ एमएम आणि पश्चिम उपनगरात २२.६१ एमएम पाऊस झाला. मुंबईत आतापर्यंत जितका पाऊस होणं गरजेचं होतं, तितका पाऊस झाला नाही. मुंबईत मुसळधार पाऊस नसून मागील काही दिवसांपासून रिमझिम, हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे.
मुंबईत कशी असेल पावासाची स्थिती?
प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील तीन दिवस चांगल्या किंवा मुसळधार पावसाचा अंदाज नाही. आतापर्यंत मुंबईत फारसा चांगला पाऊस झालेला नाही. मुंबई सोडून महाराष्ट्रातील उर्वरित भागात चांगला पाऊस पडत आहे. मुंबईत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी येतात. येत्या काही दिवसांतही मुंबईची कमी – अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत आताच्या कालावधीत यंदा मुंबईत ३० ते ४० टक्के पाऊस कमी झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झालेला नाही. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. घाट भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.