ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांना आम्ही सोबत घेतलं. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना आम्ही सोबत घेतलं, यावरुन विरोधक आमच्यावर टीका करतात. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, यासाठी कोणतीही डील झालेली नाही. कोणाच्या विरोधात केस असतील, तर ते चालू राहतील. आम्ही राजकीय युती केली आहे. आम्हाला वास्तवाचा विचार करावा लागतो. आम्ही त्यांच्यावर आरोप केले हे मान्यच आहे. पण त्यांना सोबत घेताना आम्ही कोणतंही डील केलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात सांगितलं.
सध्याच्या घडीला उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांवर केलेल्या आरोपांबद्दल फडणवीस सविस्तर बोलले. ‘आरोपांची सुरुवात २००९ पासून झाली. आम्ही २०१३ पर्यंत आरोप करत होतो. त्यावेळच्या सरकारनं चौकशी सुरु केली. त्यात अनेक अधिकारी दोषी आढळले. त्यांना शिक्षा झाली. ज्यांच्यासोबत आता आम्ही आहोत, त्यांचं नाव आरोपपत्रात नाही. एक दोष त्यात नक्की होता. ते मंत्री होते, त्यामुळे जबाबदारी त्यांची होती. तुमच्या नेतृत्त्वात त्या गोष्टी घडायला नको होत्या. आम्ही त्यावेळी बोललोच नसतो, तर या गोष्टी समोर आल्या असत्या का? इतके जण तुरुंगात गेले असते का? आम्ही त्यांच्यावर आरोप यासाठी केले, कारण ते त्या विभागाचे प्रमुख होते. ते सहभागी होते की नव्हते, हे शोधण्याचं काम तपास यंत्रणांचं आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
आदर्श प्रकरणात आरोप झालेल्या, त्यामुळे मुख्यमंत्रिपद गमावलेल्या आणि भाजप प्रवेशानंतर लगेचच राज्यसभेवर गेलेल्या अशोक चव्हाणांबद्दलही फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं. ‘चव्हाण ज्यावेळी भाजपमध्ये आले, तेव्हा उच्च न्यायालयानं त्यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती,’ असं फडणवीसांनी सांगितलं.
सक्तवसुली संचलनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेत गेले. तुरुंगवास किंवा पक्षबदल हेच पर्याय माझ्यासमोर होते, असं वायकरांनी महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. वायकर चुकीचं बोललं, असं फडणवीस म्हणाले.