घाटकोपरमध्ये गुजराती विरुद्ध मराठी, शिवसैनिकांना इमारतीत येण्यास मज्जाव, परिसरात तणाव

मुंबई: ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील घाटकोपरमधील एका सोसायटीत पुन्हा एकदा गुजरात्यांचा मराठी द्वेष समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे प्रचार पॅम्प्लेट वाटण्यासाठी इमारतीत जाऊ पाहणाऱ्या मराठी शिवसैनिक महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना तेथील गुजरात्यांनी मज्जाव केला. बऱ्याच वादावादी नंतर, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे केवळ दोन जणांनाच आत जाण्याची परवानगी देण्यात आली. या सर्व प्रकारामुळे काही गुजराती नागरिकांमध्ये मराठी द्वेष किती भरला आहे हे पुन्हा एकदा समोर आले.

नेमकं काय घडलं?

घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल भागात असलेल्या समर्पण नामक गुजराती बहुल सोसायटीत सायंकाळी ८.३० च्या सुमारास प्रचारासाठी गेलेल्या शिवसैनिकांना मज्जाव करण्यात आला. कारण विचारले असता, आपण भाजपचे पदाधिकारी असून त्यांनाच मतदान करणार असल्याने तुम्हाला आत जाता येणार नाही असे सांगत दटावले. उपस्थित महिला व पुरुष शिवसैनिकांनी आपण केवळ पॅम्प्लेट द्यायला जात असून तुम्ही कोणालाही मतदान करा तो तुमचा अधिकार असल्याची विनवणी केली परंतु तरीही त्यांना आत सोडण्यात आले नाही.

बराच वेळ अशाप्रकारे बाचाबाची झाल्यानंतर अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने केवळ दोन जणांना आत सोडण्यात आले. यामुळे शिवसैनिक आणि महाविकासआघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून पोलीस आणि निवडणूक आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे अशी विनंती केली.