पुणे पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विशाल अग्रवाल, कार चालक चत्रभूज बाबासाहेब डोळस आणि राकेश पौडवाल या तिघांना अटक केली. संभाजीनगरमधील जेपी इंटरनॅशनल नारळी बाग हॉटेलमध्ये विशाल अग्रवाल यांनी तीन रूम बुक केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल गाठले. तिथे पोलिसांनी कारचा चालक आणि आणि एकाला अटक केली.
पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न पण…
परंतु विशाल अग्रवालने पोलिसांना गुंगारा दिला होता. तीन रूम बुक करून हॉटेलमध्ये दोघेच वास्तव्याला होते. पोलिसी खाक्या दाखवून दोघांना बोलते केल्यावर त्यांनी विशाल अग्रवाल यांचा पत्ता सांगितला. त्यानंतर पोलिसांनी संभाजी नगरच्या रेल्वे स्टेशनजवळील एका अत्यंत साध्या हॉटेलमध्ये छापा टाकून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले.
पोलिसांना कळू नये किंवा त्यांना संशय येऊ म्हणून विशाल अग्रवाल यांनी महागड्या हॉटेलमध्ये न थांबता साध्या हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्यासोबतीच्या दोघांनी पोलिसांना संपूर्ण माहिती सांगितल्यावर पोलिसांनी उर्वरित कारवाई पूर्ण केली.
हा ‘क्रूर’ गुन्हा, सज्ञान म्हणून कारवाई करा, फडणवीस यांच्या पुणे पोलिसांना स्पष्ट सूचना
‘कारचालक हा अल्पवयीन जरी असला, तरीही घडलेला अपघात हा क्रूर गुन्ह्याचाच प्रकार आहे. निर्भया खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कारचालकावर सज्ञान म्हणून कारवाई करा,’ अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे पोलिसांना दिली. पोलिसांनी विधिसंघर्षित मुलाला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली असल्यास संबंधितांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यासही त्यांनी बजावले.