गर्दीपासून मुक्तता; पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशनवर दोन नवे प्लॅटफॉर्म, वाचा सविस्तर…

प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी खडकी येथे स्वतंत्र टर्मिनल विकसित करण्यासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर पुणे रेल्वे विभागाने त्याचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. खडकी रेल्वे स्थानक येथील जागेनुसार एकूण दोन फलाट तयार करण्याचे निश्चित झाले आहे. त्यात दोन मार्गिका नवीन असणार आहेत. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होऊन मुंबईकडे धावणाऱ्या काही गाड्या येथून सोडणे शक्य होणार आहे.

पुणे रेल्वे विभागातील पुणे रेल्वे स्थानक सर्वांत मोठे स्थानक आहे. या ठिकाणी सहा फलाट आहेत. या स्थानकावरून दिवसाला साधारण ४५ रेल्वे गाड्या सुटतात, तर ८०हून अधिक गाड्या ये-जा करतात. भविष्यात आणखी गाड्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानक येथून दिवसाला सव्वा लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकावरील वाढता ताण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हडपसर व खडकी येथे दोन टर्मिनल विकसित करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला होता. त्यापैकी हडपसर रेल्वे टर्मिनलला मंजुरी मिळून त्याचे कामदेखील सुरू आहे. खडकी टर्मिनललाही रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कामाचा आराखडा तयार करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार खडकी टर्मिनल येथे करण्यात येणाऱ्या कामाचा आराखडा पूर्ण झाला आहे. त्यानुसार येथे नव्याने एक फलाट विकसित करण्यात येणार आहे. दोन स्टेबलिंग लाइन विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठी बोर्डाकडून ३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात प्रवाशांच्या सोईच्या दृष्टिकोनातून विविध कामे केली जाणार आहेत. कामाचा आराखडा पूर्ण झाल्यामुळे खडकी टर्मिनलचे काम लवकरच सुरू केले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना फायदा

खडकी टर्मिनल विकसित केल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यादेखील येथून सोडणे शक्य होईल. काही लोकलसुद्धा येथून सोडता येतील. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्याचा फायदा पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना होणार आहे.

स्वातंत्र्यदिनावेळी ‘मिशन रफ्तार’; मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ताशी १६० किमी वेगाने धावणार
पादचारी पुलाचाही विस्तार
– नव्याने एक फलाट तयार केला जाणार.
– एका पादचारी पुलाचा विस्तार होणार.
– दोन स्टेबलिंग लाइन तयार केल्या जाणार.
– टर्मिनलच्या विकासासाठी ३७ कोटी रुपये मंजूर.

खडकी येथे नवीन टर्मिनल विकसित करण्यासाठी बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणत्या आणि कशा पद्धतीने काम करायचे, याचा आराखडाही पूर्ण झाला आहे. टर्मिनलला एकूण तीन मार्गिका असणार आहेत.- इंदु दुबे, व्यवस्थापक, पुणे रेल्वे विभाग