खडकवासल्यात डाव फिरला, इंदापूर वनसाईड; काका, पुतण्याची गणितं फेल; बारामतीत कोणाचा गेम?

पुणे: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात काल मतदान झालं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ५६.९७ टक्के मतदान झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६४.५० टक्के मतदान झालं. तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असलेल्या खडकवासल्यात ५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. विशेष म्हणजे काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवारांची गणितं कालच्या मतदानामुळे पूर्णपणे विस्कटली. त्यामुळे आता दोघांचीही धाकधूक वाढली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वाधिक मतदारसंख्या खडकवासल्यात आहे. इथे भाजपचं वर्चस्व आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या कांचन कुल मैदानात होत्या. खडकवासल्यातून कुल यांना ७० हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. पण सुळेंनी बारामतीच्या जोरावर ही आघाडी कापून काढली. महायुतीत गेलेल्या अजित पवारांची भिस्त यंदा खडकवासल्यावर होती. पण खडकवासल्यात झालेलं कमी मतदान अजित पवारांची चिंता वाढवणारं आहे.
ताई त्यांनी औकात काढली! आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला कार्यकर्ता सुळेंसमोर ढसाढसा रडला
खडकवासल्यात भाजपला मानणारा मतदारवर्ग आहे. पण यंदा मतदारसंघात कमळ चिन्हावरचा उमेदवार नसल्यानं भाजपचा मतदार फारसा बाहेर पडला नाही. खडकवासल्यात अधिक लीड घ्यायचं आणि त्याच्या जोरावर निवडणुकीत बाजी मारायची, असा अजित पवारांचा मनसुबा होता. पण तो पूर्ण होताना दिसत नाही. बारामतीत झालेलं चांगलं मतदान मात्र अजित पवारांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या पथ्थ्यावर पडेल.
तुझी मस्ती उतरवेन! अजित पवारांच्या आमदाराची शिवीगाळ; VIDEO समोर, सुप्रिया सुळे संतापल्या
सुप्रिया सुळेंना बारामतीत ५०-५० वर रोखायचं. भोर, इंदापूर, पुरंदर, दौंडमध्ये सुळेंनी १० ते १२ हजार मतांचं लीड मिळवलंच तर खडकवाल्यातील भाजपच्या मतदारांच्या आधारे ते एकहाती कापायचं, असे आडाखे अजित पवारांनी बांधले होते. पण खडकवासल्यात कमी मतदान झाल्यानं दादांचं गणित फिस्कटलं. खडकवासल्यात ६० टक्के मतदान झालं असतं तर अजित पवारांची चिंता मिटली असती. पण तसं घडलेलं नाही. खडकवासल्यातून अजित पवारांना ५० ते ६० हजारांचं मताधिक्क्य अपेक्षित होतं.
सुप्रिया सुळे मतदान सुरु असताना अजित पवारांच्या घरी; चर्चांना उधाण, या भेटीमागे दडलंय काय?
खडकवासल्याची उणीव इंदापूरमध्ये भरुन निघेल, असं ग्राऊंड रिपोर्ट सांगत आहेत. इंदापूरमध्ये बारामीतच्या खालोखाल म्हणजेच ६२.५० टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले आमदार दत्ता भरणे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. मतदान आपल्या बाजूनं व्हावं यासाठी सगळ्याच मार्गांचा वापर करण्यात आला. इथले माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. शरद पवारांच्या पक्षाकडे इंदापुरात सक्षम नेताच नसल्यानं इथली लढाई वनसाईड ठरल्याचं चित्र आहे. ज्याचा फायदा सुनेत्रा पवारांना होईल.
पीडीसीसी बँक कधी रात्रीची उघडी दिसली? पैसेवाटपाच्या आरोपांवर अजितदादा रोहित पवारांवर बरसले
दौंडमधलं मतदान ५०-५० टक्के असू शकतं. इथे भाजपचे राहुल कुल आमदार आहेत. पण त्यांचं ऐकणारा मतदार फारसा नसल्याचं बोललं जातं. काँग्रेसचे आमदार असलेल्या भोरमधून सुळेंना लीडची अपेक्षा होती. इथे सामना ७०-३० असा राहील अशी आशा सुळेंना होती. पण तसं घडलं नाही. इथलं मतदान ५०-५० राहिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भोरमध्ये सुळेंचं गणित फिस्कटलंय. खडकवासल्यात दादांचा अंदाज चुकलाय, तशीच अवस्था ताईंची भोरमध्ये झालीय. त्यामुळे काका, पुतण्याचं टेन्शन वाढलंय.

इंदापुरात शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी आधी पवारविरोधी राग आळवला होता. पण नंतर ते शांत झाले. त्यांनी अजित पवारांसाठी काम केलं. पण शिवतारेंना मानणारा वर्ग, त्यांचे कार्यकर्ते अजित दादांना मानणारे नाहीत. त्यामुळे अजित पवारांसाठी इथली परिस्थिती फारशी चांगली नाही. इथे काँग्रेसच्या संजय जगतापांनी आघाडीधर्म पाळत सुळेंसाठी काम केलं. त्यामुळे इथून सुप्रिया सुळेंना लीड मिळू शकतं.