केंद्रात मंत्रिपद मिळणार का? सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाल्या…

बारामती: बारामती लोकसभेची चुरशीची झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. या निवडणुकीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार पदी वर्णी लागल्यानंतर त्या पहिल्यांदाच बारामती आल्या होत्या. यावेळी त्यांनी पहिलीच प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी पहिल्यांदाच बारामतीत आले आहे. मला बारामती मतदारसंघातील मतदारांचे, जनतेचे आभार मानायचे होते. त्यांना भेटायचे होते त्यानिमित्ताने मी आज भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आज या सर्वांना भेटून मला आनंद झाला आहे. मी या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. कारण त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांनी दिली.
अजितदादा संकटात, भाजपसोबत सुंदोपसुंदी; पवारांकडून शस्त्रसंधी, राजकारणात इंटरेस्टिंग घडामोडी

सुनेत्रा पवारांच्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाची चर्चा

सध्या राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदासाठी वर्णी लागण्याची चर्चा आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, या संदर्भात मला काही कल्पना नाही. या मोजक्या शब्दातच त्यांनी उत्तर दिले. पुढील वाटचाल व विधानसभा निवडणुकी संदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या की, ही सध्या सुरुवात आहे. ज्या गरजा आहेत, मागण्या आहेत, त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे आणि जनतेची कामे करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामतीत राज्यसभेच्या खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच बारामती मध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने बारामतीकर नागरिकांनी गर्दी केल्याची पाहायला मिळाली.