काही महिन्यांनी अचानक जागे होतात आणि बोलतात, पवारांचा राज ठाकरेंना टोला, एकच हशा

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमला असून आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तसंच महाराष्ट्रभरातील इतरही अनेक विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी जमली असून सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पंढरपूरमध्ये महापूजा केली.

अनेक नेते आजच्या खास दिवशी शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत विठुरायाला साकडं घातलं. त्यांनी एक्सवरुन पोस्ट केली आहे. ‘विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.’ अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाला केली आहे. शरद पवार यांना राज ठाकरे यांच्या ट्विटबाबत विचारणा केली असता, त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Vasant More : वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन, पक्षप्रवेशावेळीच उद्धव ठाकरेंकडून तात्यांना शिक्षा
राज ठाकरे यांच्या ट्विटवर बोलताना पवार म्हणाले, ते जेव्हाही बोलतात, त्यांचं वैशिष्ट्य आहे. ८ ते १० दिवसांनी, दोन महिन्यांनी कधी ते जागे झाले की बोलतात. ज्या विषयाची वाचकांकडून दखल घेतली जाईल, उद्याच्या पेपरमध्ये ज्याची बातमी होईल, त्याच विषयावर ते बोलतात, असं म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देत राज ठाकरे यांची फिरकी घेतली.
Devendra Fadnavis : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत उमेदवारी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/ias-officer-pooja-khedkar-training-hold-and-summoned-back-to-mussoorie-academy-what-will-happen-next/articleshow/111787811.cms

राज ठाकरेंनी ट्विटमध्ये काय लिहिलंय?

‘आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं.

देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो.

पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेंव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही.

म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.

पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!’