वायव्य मुंबई मतदारसंघाचे मावळते खासदार आणि शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कीर्तीकर यांच्यावर आरोप केला होता.
‘अमोल कीर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता, हा माझा जाहीर आरोप आहे. एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तीकरांसमोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील आणि दुसरा कोणीही उमेदवार नसेल आणि नंतर गजानन कीर्तीकर उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि आपल्या मुलाला बिनविरोध खासदार निवडून आणायचे, हा गजानन कीर्तीकरांचा पूर्वनियोजित कट होता,’ असा माझा आरोप असल्याचे दरेकर यांनी म्हटले होते.
त्यानंतर आता गजानन कीर्तीकर यांनी दरेकरांच्या या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले. ‘भाजपचे नेतेच कटकारस्थानी असून, दुसऱ्यावर आरोप करतात. त्यामुळे त्यांची डोकी तशीच चालतात. कट करणे हे माझ्या रक्तात नाही. अमोलने निवडणूक लढविणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. अमोल हा शिंदे गटाकडून लढण्यास तयार नव्हता. माझे निवृत्तीचे वय झाल्याने व मुलाविरोधात लढणे उचित नसल्याने मीही लढणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते,’ असे कीर्तिकर यांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळेल आणि आपला मुलगा नगरसेवक, आमदार नव्हे तर थेट खासदार होईल, असे पक्षविरोधी विधान केल्याप्रकरणी खासदार गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केली आहे. तसे पत्रदेखील त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी गजानन कीर्तीकर यांनी आपल्याशी बुधवारीच संपर्क साधून दिलगिरी व्यक्त केली आहे. आता त्यांच्याबाबत पुढील जो काही निर्णय आहे तो पक्ष घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.