बिनविरोध निवडीची शक्यता
संघटनेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. अध्यक्षपदासाठी जुन्नरचे आमदार बेनके यांचाच अर्ज आल्याचे सुत्रांनी सांगितले. बेनके हे पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आहेत. मला याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही, त्यामुळे याबाबत आत्ताच काहीही बोलणे योग्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले. मोहन गायकवाड हे नाशिक जिल्हा संघटनेचे प्रमुख कार्यवाह आहेत.
दरम्यान, या संघटनेच्या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांच्या पडताळणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. संघटनेची निवडणुक २१ जुलैस होणार आहे. त्यापूर्वी आज, गुरुवारपासून अर्जांची छाननी होईल आणि १६ जुलैपर्यंत अर्ज माघारी घेता येतील.
कीर्तिकर कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवलेले अमोल कीर्तिकर यांच्यासह अमरसिंह पंडित आणि दिनकर पाटील यांनी कार्याध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असल्याचे सुत्रांनी सांगितले. याचवेळी सचिवपदासाठी मंगल पांडे आणि रवींद्र देसाई शर्यतीत असतील असेही सुत्रांनी सांगितले. उमेदवारांची यादी आज, गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या या महिन्याअखेरीस होणाऱ्या निवडणुकीतील मतदार यादी अंतिम झाली आहे. मात्र, संलग्न संघटनांनी पाठवलेल्या यादीतील सात अर्ज बाद झाले आहेत. त्यात खासदार नीलेश लंके; तसेच उदय सामंत यांचेही नाव आहे. पालघरने सादर केलेल्या चारपैकी तिघांची नावे बाद करण्यात आली आहेत.
नीलेश लंके-उदय सामंत मतदानास अपात्र
राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी संलग्न जिल्हा संघटनांनी मतदारांची नावे पाठवणे बंधनकारक असते. यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदारात बदल केल्यास त्याची माहिती धर्मादाय आयुक्तांकडे देणेही बंधनकारक असते. धर्मादाय आयुक्तांनी हे बदल मान्य केल्याची नोंद आवश्यक असते किंवा त्याबाबतचा अर्ज केल्याची पावती सादर करणे बंधनकारक असते. हे सर्व सादर करण्यासाठी ३० जूनची मुदत होती. त्यानंतर आलेल्या अर्जांना फेटाळून निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांची नावे नाकारली.
नीलेश लंके, सचिन भोसले (नगर), उदय सामंत (रत्नागिरी); तसेच मनोज ठाकूर, वल्केश राऊत आणि माणिक दुतोंडे (पालघर) यांना पीटीआर (मतदार यादीतील बदलाबाबत) उताऱ्यावर नाव नाही, असे सांगून मतदार होण्यास नकार देण्यात आला. याच वेळी सातारा संघटनेने
महिलांसाठी राखीव असलेल्या चौथ्या क्रमांकाच्या ठिकाणी समीर थोरात यांचे नाव दिले. त्यामुळे तेही फेटाळले गेले. राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसार निर्णय घेतला आहे, असे संघटनेचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे यांनी सांगितले.