‘मुख्यमंत्री बदलणार, एकनाथ शिंदे यांच्या जागी राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार’ अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, प्रसारमाध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी हा विश्वास व्यक्त केला. ‘काही लोकांना वावड्या उठवण्याची सवय असते. मुख्यमंत्री खंबीर आहेत. निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलण्याची सुतराम शक्यता नाही. दिवसाचे २४ तास काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. मुख्यमंत्री बदलला जाणार नाही,’ असे शिरसाट म्हणाले.
आमदार शिरसाट यांनी पुण्यातील अपघाताविषयी भाष्य केले. ‘अजित पवारांनी फोन का केला? त्याने का केला नाही. याने का केला? अशा चर्चांना काही अर्थ नाही. या घटनेत दोन जणांचा जीव गेला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. याच्याशी सरकार सहमत आहे. पोलिस त्या दृष्टीने काम करत आहेत,’ असे शिरसाट म्हणाले.
‘आरोप म्हणजे गुन्हेगार नाही’
पुणे प्रकरणी तपासासाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. पण सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याबाबत विचारले असता, ‘सध्या पुण्याचे प्रकरण हाताळणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तो भाग वेगळा आहे. आरोप आणि चौकशी दोन वेगळे भाग आहेत. काही मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तेही मंत्रिमंडळात होते ना? त्यांना फाशी दिली का? एखाद्या अधिकाऱ्यावर चौकशी लागली, म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही. या प्रकरणाचा छडा लागू द्या. अधिकाऱ्याला विनाकारण हैराण करू नका,’ असे आवाहन त्यांनी केले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘सरकार आमचेच’
‘‘इंडिया’ने निवडणुकीसाठी रणनीती ठरवली होती. त्यांनी राज्यघटना बदलणार, हा मुद्दा घेतला. दलित समाज आपल्या बाजूने आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या मुद्द्याने दलित समाज विचलित झाला खरा, पण त्याचा परिणाम एनडीएवर होणार नाही. लोकांना समज आहे, त्यांनी योग्य ते मतदान केले आहे. येणारे सरकार एनडीएचेच असणार आहे,’ असा दावा शिरसाट यांनी केला.