एअर इंडियात जागा ६००, जमा झाले २५ हजार तरुण, ​मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती

मुंबई : एअर इंडियातील लोडर्सच्या मेगाभरती मोहिमेमुळे मुंबई विमानतळावर मंगळवारी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ६०० रिक्त पदांसाठी २५ हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज केला होता. त्यामुळे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड गर्दी हाताळताना नाकीनऊ आले.

अर्जदार फॉर्म काऊंटरपर्यंत पोहोचण्यासाठी एकमेकांशी धक्काबुक्की करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. अनेक इच्छुकांना खाण्या-पिण्याशिवाय तासतासभर रांगेत थांबावे लागले. त्यामुळे अनेक जणांनी अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार केली.

एअर इंडियाची लोडर्ससाठी भरती प्रक्रिया

सध्या एअर इंडियाकडून एअरपोर्ट लोडर्ससाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. विमानात सामान लोड करणे आणि उतरवणे, बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रॅक्टर चालवणे हे काम लोडर्सना दिले जाते. प्रत्येक विमानाला प्रवाशांचे सामान, माल वाहतूक आणि अन्न पुरवठा हाताळण्यासाठी किमान पाच लोडर्सची आवश्यकता असते.

शैक्षणिक निकष आणि पगार किती?

विमानतळ लोडर्सचा पगार दरमहा २० हजार ते २५ हजार रुपयांच्या घरात असतो. परंतु बहुतेक जणांना ओव्हरटाईम भत्त्यानंतर ३० हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई करता येते. नोकरीसाठी शैक्षणिक अर्हता सर्वसामान्य आहे, परंतु उमेदवार शारीरिकदृष्ट्या धडधाकट असणे आवश्यक आहे.
Warkari Accident : २५ वर्षांचा शिरस्ता, हौसाबाई विठ्ठलाच्या ओढीने निघालेल्या, पण पंढरीची वाट स्वर्गाकडे वळली

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इच्छुक मुंबईत

बुलढाणा जिल्ह्यातील प्रथमेश्वर अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईला आला होता. मुलाखतीसाठी त्याने जवळपास ४०० किमीचा प्रवास केला होता. “मी हॅन्डीमन पदासाठी अर्ज करण्यासाठी आलो आहे. ते २२ हजार ५०० रुपये पगार देत आहेत” असं तो म्हणाला.
Scheme for Students : लाडकी बहीणनंतर भाऊरायांसाठी मुख्यमंत्र्यांची योजना, दरमहा १० हजार मिळणार, पंढरपुरातून घोषणा
प्रथमेश्वर हा बीबीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. नोकरी मिळाल्यास शिक्षण सोडणार का, असे विचारले असता “काय करू? इथे प्रचंड बेरोजगारी आहे. मी सरकारला रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याची विनंती करतो.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

गुजरातनंतर मुंबईत घटना

गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे वॉक-इन इंटरव्ह्यूमध्ये नोकरीच्या शोधात आलेल्या शेकडो तरुणांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचे व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मुंबई विमानतळावरही तशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे.