उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमध्ये, विधिमंडळात अकल्पनीय दृश्य, दोघांमध्ये काय चर्चा?

मुंबई: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झालं आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळातील हे अखेरचं अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जाईल, अशी शक्यता होती. विधिमंडळात आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळेल असं वाटत असताना मात्र विधिमंडळात वेगळंच चित्र पाहायला मिळालं.विधिमंडळात आज एक सुखद चित्र पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेना वेगळे झाल्यापासून सतत एकमेकांवर टीका करणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनात एकत्र दिसून आले. विधानभवनाच्या लिफ्टसमोर त्यांची भेट झाली आणि ते लिफ्टमधून एकत्रच चर्चा करत सभागृहात गेले. त्यांनी आजच्या कामकाजावर चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता हे दृश्य पाहायला मिळेल याची शक्यता फार कमी होती.
चंद्रकांत पाटील-ठाकरे भेट; अभिनंदनानं भुवया उंचावल्या, उद्धव म्हणाले, असंच प्रेम राहू द्या!

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमध्ये

विधिमंडळातील लिफ्टजवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस येऊन थांबले. एकमेकांसमोर आल्यानंतर कोणीही कोणाला टाळलं नाही, उलट त्यांनी एकमेकांसोबत संवाद साधला. नक्कीच यावेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये फार चर्चा झाली नसली तरी त्यांनी एकमेकांकडे दुर्लक्षही केलं नसल्याचं दिसून आलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकमेकांवर सतत टीका करताना दिसून आले. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती. मात्र, त्यांची आजची समोरासमोर झालेली भेट पाहता ती कटुता आता कमी होतेय की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यांच्या या भेटीने महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या भुवया नक्की उंचावल्या असतील.

चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे भेट

तर, तिकडे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विरोध पक्षनेत्यांची भेट घेतली. यावेळी ते विधानपरिषदेतील विरोध पनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी तिथे उद्धव ठाकरे आणि अनिल परबही उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी विरोध पक्षनेत्यांना चॉकलेट दिले तर दानवेंनी चंद्रकांतदादांना पेढा दिला. यावेळी नेत्यांनी हसतखेळत एकमेकांशी संवाद साधला. तसेच, तुमचं असंच प्रेन कायम राहू द्या, असं उद्धव ठाकरे चंद्रकांतदादांना म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली.