इंदापुरात पोस्टर वॉर, निकालापूर्वीच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर

इंदापूर: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पोस्टर वाँर चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गट व अजित पवार गटाकडून आपापल्या उमेदवाराचे विजयाचे बॅनर इंदापुरात झळकले आहेत. निकालापूर्वीच झलकलेल्या या बॅनरमुळे सध्या एकच चर्चा सुरू आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या ननंद भावजय मध्ये असा सामना रंगला. निकालानंतर कोण विजयाची गुढी उभारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधीच बारामती लोकसभा संघातील इंदापूर मध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन या आशयाचा बॅनर झळकविण्यात आला आहे. तर काल शनिवार रोजी इंदापूर मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा या आशयाचे बॅनर झळकले आहेत. निकालापूर्वीच दोन्ही गटाकडून विजयाचे बॅनर वाँर इंदापुरात बघायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर…

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ६ वाजता पवारांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करुन संबंधितांना सुचना केल्या. कामाचा दर्जा राखण्याबरोबरच ही सर्व कामे दिर्घकाळ टिकावीत यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना यावेळी अजित पवारांनी दिल्या.