‘इंडिया’ कसा निवडणार PMपदाचा चेहरा? पवारांनी सांगितला ‘देसाई’ फॉर्म्युला, मोदींना उत्तर

मुंबई: राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान आज होतंय. सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होतेय. महाविकास आघाडीला राज्यात किमान २४ जागा मिळवतील, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी व्यक्त केला. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता येईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. जनमानसातून तसे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यंदा १८ सभा घ्याव्या लागल्या, याकडेही शरद पवारांनी लक्ष वेधलं. ‘लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी भाजपनं अब की बार ४०० पारचा नारा दिला होता. पण आता त्यांना बहुमत तरी मिळेल का, याबद्दल मला शंका वाटते,’ असं पवार म्हणाले.
Raj Thackeray: ज्योतिषी म्हणून बसलोय का? राज ठाकरेंचा प्रतिप्रश्न; ‘सायलेंट’ फॅक्टर प्रश्नावर काय घडलं?
इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा कुठेय? पंतप्रधान कोण होणार? असे प्रश्न पंतप्रधान मोदींसह भाजपचे अनेक नेते उपस्थित करतात. त्यांच्या प्रश्नांना शरद पवारांनी उत्तर दिलं. ‘काही दशकांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते. सरकार स्थापनेसाठी जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हा निवडून गेलेल्या खासदारांनी देसाईंची निवड केली होती. इंडिया आघाडीला संधी मिळाल्यास तसंच होईल’, असं पवारांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी राज्यातील प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख नकली संतान, त्यांच्या पक्षाचा उल्लेख नकली सेना असा केला. पुण्यातील सभेत शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला होता. त्यावरुन पवारांनी उत्तर दिलं. पंतप्रधानांकडून अशा विधानांची अपेक्षा नव्हती. मोदींनी भाषेची पातळी सोडली. त्यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, अशी टीका पवारांनी केली.