‘आईस्क्रीम मॅन’ कालवश; अस्सल फळांच्या आईस्क्रीमने उद्योग विश्वात नाव कमावलेल्या कामत यांचे निधन

मुंबई : ‘आईस्क्रीम मॅन’ म्हणून भारतात ख्याती असणारे नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवासन कामत कालवश झाले आहेत. ७५ वर्षीय रघुनंदन कामत यांच्यावर मागील काही दिवसांपासून मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

स्पर्धेच्या या युगात कठीण प्रसंगात फळं विक्री करुन रघुनंदन यांनी आपलं कोट्यावधींचं साम्राज्य उभारलं होतं. कामत यांनी १९८४ मध्ये नॅचरल्स आईस्क्रीमची स्थापना केली होती व मुंबईतील जुहू परिसरात पहिले स्टोअर सुरू केले. आता त्यांचा पसारा वाढला असून देशभरात नॅचरल्स आईस्क्रीमचे १३५ ठिकाणी स्टोअर आहेत. आईस्क्रीमच्या नैसर्गिक पण अनोख्या चवीने नॅचरल्स आईस्क्रीमला देशभरात लौकिक मिळाला. त्यामुळे देशातली सर्वोत्तम खाद्यपदार्थांच्या ब्रँडमध्ये नॅचरल्स हा ब्रँड गणला जातो.

कंपनीने अधिकृत ‘एक्स’ हँडलवर पोस्ट लिहीत दिली आदरांजली

रघुनंदन आपल्या व्यावसायिक प्रवासात यश अपयश दोन्हीला सामोरे गेले होते. रघुनंदन यांचे वडील फळ विक्रेते होते त्यामुळे त्यांना फळांचा चवीचे लहानपासूनच आकर्षित करत होता. गरीबी सहन करत त्यांचे भाऊ गोकुळ नामक ढाबा चालवत होते. रघुनंदन सुज्ञ झाल्यावर १९६६ मध्ये त्यांनी मुंबई पदार्पण केले आणि भावांच्या व्यवसायाला हातभार लावला. भावांच्या ढाब्यावर ते ग्राहकांना आईस्क्रीमही देत होते. याच आईस्क्रीमला घेऊन त्यांना आपली वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्यावेळी प्रस्थापित ब्रँड बाजारात असून देखील रघुनंदन यांनी जोखीम पत्करत आईस्क्रीमचंच स्टोअर सुरु करण्याचा निर्णय घेतला. स्टोअरची सुरुवात बारा फ्लेवर्सने झाली. मात्र अनोख्या चवीमुळे आईस्क्रीम पार्लरचे स्वरूप हळूहळू बदलू लागले. आणि त्यांनी बाजारात आपले स्थान बनवले. आता हा ‘आईस्क्रीम मॅन’ कालवश झाल्याने उद्योग विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.