लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘मटा कॅफे’ या विशेष कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी यांसारख्या बड्या नेत्यांना बाजूला करण्यासाठी ७५ वर्षांचा अट ठेवली, असा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. याप्रकरणी मोदी काय उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘आकड्याची भविष्यवाणी करणे हे धोक्याचे असते. लोकांच्या मनात काय आहे, हे स्पष्ट आहे. माझ्या दृष्टिकोनातून सध्या सहा राज्य महत्त्वाची आहेत. ज्यात बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये भाजपची संख्या कमी होईल. महाराष्ट्राचेच उदाहरण द्यायचे तर पक्ष फोडण्याचा प्रकार मतदारांनी पाहिला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये या सर्व प्रकाराबाबत प्रचंड सहानभूती आहे. त्यामुळे आघाडीला महाराष्ट्रात २४ किंवा २५ जागा मिळतील, असे मी आधीच स्पष्ट केले आहे. पण सध्याची स्थिती पाहता हा आकडा ३२ ते ३५ जागांपर्यंत जाईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपची ४०० पार ही घोषणा त्यांच्या अंगलट आली आहे. सध्या ३०३ पेक्षा जास्त जागा याव्यात, यासाठी मोदींची धडपड सुरू आहे. भाजपला २२० ते २५० तर एनडीएच्या मिळून २७२ जागांपर्यंतही ते जाणार नाहीत, असे भाकीत त्यांनी यावेळी वर्तवले.
‘हिंदू-मुस्लिम मुद्दा असो किंवा अदानी, अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे दिल्याचे केलेले वक्तव्य, हे दोन्ही मुद्दे निवडणुकीत टर्निंग पाइंट असणार आहेत. आमच्याकडे जर पैसे आले असतील तर ‘ईडी’सारख्या यंत्रणा काय करत आहेत’, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला. ‘याचाच दुसरा अर्थ असा की देशातील उद्योगपतींना वारा कुठल्या दिशेने वाहतो आहे, हे स्पष्ट दिसू लागले आहे’, असे ते म्हणाले. ‘मुस्लिम मतांवरून राजकारण सुरू आहे, असे अजिबात नाही. हे राजकारण हिंदू मतांचे आहे. मुस्लिम समाजामध्ये भय निर्माण करून हिंदूंची मते खेचून घेण्याचा हा सर्व प्रकार आहे. पंतप्रधान मुस्लिमांबाबत जे बोलत आहेत, ते द्वेषाचे वक्तव्य देशाच्या इतिहासात कोणत्याच पंतप्रधानांनी केलेले नाही. त्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाचा केलेला हा प्रकार चुकीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणात आता सावरासावर सुरू केली’, असा दावा चव्हाण यांनी केला.
‘राष्ट्रवादीने ऑफर दिली होती’
‘लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मला उमेदवारी देण्यात आली होती. पण मी तुतारी चिन्हावर लढण्यास नकार दिला. त्याचवेळी २०१९च्या निवडणुकीवेळीही राष्ट्रवादीकडून विचारणा झाली होती. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये एकमत न झाल्याने याठिकाणी इतर नावाला पसंती दर्शविण्यात आली’, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘दोन पक्ष कमी होतील’
‘शरद पवार यांनी काही पक्ष काँग्रेसमध्ये येत्या काळात विलीन होतील, अशी शक्यता वर्तविली होती. त्याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात सहा पक्ष टिकणे अवघड आहे. त्यामुळे इतर दोन पक्ष येत्या काळात कमी होतील असे मला वाटते’, असे चव्हाण म्हणाले.