राष्ट्रवादीसोबत केलेल्या युतीमुळे भाजपचा ब्रँड डॅमेज झाल्याचं विश्लेषण करत संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनं अजित पवारांना लक्ष्य केलं. या लेखातून भाजपचीदेखील कानउघाडणी करण्यात आली. यानंतर भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांनीदेखील दादा गटावर शरसंधान साधण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडल्याची आकडेवारी मांडली जाऊ लागली.
भाजप, शिंदेसेनेकडून शाब्दिक हल्ला सुरु होताच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मित्रपक्षांना थेट इशारा दिला. अजित पवारांना जाणूनबुजून लक्ष्य करत असाल तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मिटकरींनी दिला. दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांनी महायुतीच्या अपयशाचं खापर भाजप नेत्यांवर फोडलं. ‘संघासोबत काय झालं हा त्यांचा मुद्दा. अजित पवारांमुळे भाजपला कोणतंही नुकसान झालेलं नाही. उलट भाजपवर असलेल्या लोकांच्या रागाचा फटका आम्हाला बसला,’ असं पाटील म्हणाल्या.
भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली असताना शरद पवार गटाच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका आश्चर्यकारक मानली जात आहे. पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवारांची अप्रत्यक्षपणे बाजू घेत भाजपला सुनावलं आहे. अजित पवारांना बळीचा बकरा करण्यात येत असल्याचं आमदार रोहित पवार म्हणाले. राज्यात तिरंगी लढत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तशी लढत झाल्यास फायदा होईल असा भाजप नेत्यांचा कयास आहे. अजित पवार भाजपच्या पराभवाला कारणीभूत नाहीत, असं रोहित पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीदेखील अशीच भूमिका मांडली. महायुतीच्या सुमार कामगिरीला भाजपचे नेते स्वत: जबाबदार आहेत. कारण त्यांनीच घटना बदलण्याचा विषय उपस्थित केला. त्यामुळे दलित आणि अन्य समाजांमध्ये भीती निर्माण झाली. भाजपनंच अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य केलं. त्यामुळे दलित आणि अल्पसंख्यांक समाज भाजपविरोधात एकवटला, असं निरीक्षण नोंदवत आव्हाडांनी भाजपला लक्ष्य करत दादांना पूरक भूमिका घेतली.