भारतीय जनता पक्षाची (एकनाथ शिंदे यांच्या) शिवसेनेसोबत असलेली युती भावनिक आहे, तर (अजित पवार यांच्या) राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती ही स्ट्रॅटेजिक आहे, असं खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. लोकसभेला अजितदादांचा एकच खासदार निवडून आलेला असल्यामुळे राष्ट्रवादीची एनडीएला तशा अर्थाने गरज नाही. मुळात महाराष्ट्रातही ती कधीच नव्हती, मात्र आता भविष्यात ती त्याहून नसेल, असे संकेत मिळत आहेत.
मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळत नाहीये, केवळ राज्यमंत्रिपदाची ऑफर आहे, म्हणून ती झिडकारत अजितदादांनी मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला. कॅबिनेट मंत्रिपद मिळेपर्यंत थांबणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झालंय, फक्त आता केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याचा अवकाश आहे. मात्र आता सुनेत्रा पवारांनीही मंत्रिपदाचे वेध लागल्याने नेमकं काय होणार, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीशिवायही महायुती बळकट आहे. २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा १४५ आहे. तर सध्याची महायुतीची ताकद २०३ आहे. त्यातून अजित पवारांचे ४० आमदार वजा केले, तरी १६३ हा मोठा आकडा राहतो. म्हणजे भाजप अधिक शिंदेंची शिवसेना अधिक अपक्ष यांच्या साथीने महायुती मजबूत आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्वबळावर दीडशेहून अधिक जागा लढण्याचा मानस आहे. जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपला थोडे मार्जिनही ठेवावे लागेल. अशात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनाही सामावून घेणे, भाजपला कठीण जाऊ शकते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचा हात सोडून सेना-भाजपच विधानसभेला सामोरे जाऊ शकतात.