अजितदादांसोबत १२ मिनिटे बाप्पांचे बोलणे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, सोनवणेंचा फोन बंद

प्रतिनिधी, मुंबई : बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना फोन केला. सोनवणे यांनी तब्बल १२ मिनिटे पवार यांच्याशी चर्चा केली याचा मी स्वतः साक्षीदार आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी ट्वीट करुन एकच खळबळ उडवून दिली. दरम्यान, सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
पंकजांना पाडून जाएंट किलर ठरलेल्या बजरंग बाप्पांचं प्रमोशन? थेट पवारांशेजारची खुर्ची मिळाली!राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी-शरद पवार पक्षांचे वर्धापनदिन सोमवारी अनुक्रमे षण्मुखानंद सभागृह, शीव आणि अहमदनगर येथे पार पडले. अहमदनगर येथील सभेत बजरंग सोनवणे यांचा उल्लेख जायंट किलर असा करत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना आपल्या डोक्यावरील फेटाही घातला. या घटनेला २४ तासही उलटत नाहीत तोच अजित पवार यांच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.


आमदार मिटकरी यांनी दावा केला की, मंगळवारी सकाळी ते अजित पवार यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी येथे असताना त्यांना खासदार सोनवणे यांचा फोन आला. मटाशी बोलताना मिटकरी म्हणाले की, दोघांमध्ये तब्बल १२ मिनिटांचे संभाषण झाले. यात सुरुवातीला सोनवणे साखर कारखान्याबद्दल बोलले पण त्यानंतर दोघांमध्ये काय संभाषण झाले हे मला ठाऊक नाही, असे बोलून मिटकरी यांनी गूढ वाढविले आहे. दरम्यान, याविषयी वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी खासदार सोनवणे यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे दोन्ही फोन नंबर बंद असल्याचे आढळून आले.