अजितदादांना धक्का, शिंदेसेनेला वाटा; विधानसभेसाठी भाजपचा प्लान ठरला? फडणवीसांनी गणित मांडलं

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात धक्का बसला. केंद्र आणि राज्यातील सत्तेचं पाठबळ असूनही महायुतीची घसरगुंडी उडाली. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीनं ३० जागा खिशात घातल्या. या पराभवाचं चिंतन करण्यासाठी महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पक्षानं काल मुंबईत बैठक घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतील घडामोडी पाहता महायुतीत लवकरच मोठी उलथापालथ घडण्याचे संकेत मिळत आहे. भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत विधानसभेची निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. राज्यात १५७ जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. त्यामागचं गणित फडणवीसांनी भाजप कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मांडलं.
ठाकरेसेना विधानसभा स्वबळावर लढणार? संपर्कप्रमुखांना सूचना; ‘त्या’ प्रश्नानं सस्पेन्स वाढला
राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होईल. भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी बैठकीत दिली. ‘लोकसभा निवडणुकीत पक्षानं विधानसभेच्या १२५ जागांवर आघाडी घेतली. तर २५ पेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये आपण अतिशय कमी मतांनी पिछाडीवर राहिलो. योग्य रणनीती आखून आपण मार्गक्रमण केल्यास विधानसभेच्या १५७ जागांवर आपण सहज जिंकू शकतो,’ असं गणित फडणवीसांनी मांडलं. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत.
भाजप दादांची साथ सोडण्याच्या तयारीत? क्रोनोलॉजी ‘ऑर्गनाईज्ड’; फक्त ‘मेसेज’चं टेन्शन
फडणवीसांनी मांडलेली आकडेवारी पाहता गेल्या निवडणुकीत १०५ जागा जिंकणारा भाजप यंदा १५० पेक्षा अधिक लढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं. लोकसभा निवडणुकीची कामगिरी पाहिल्यास शिंदेसेनेनं १५ जागा लढवून ७ जागा जिंकल्या. भाजपनं २८ जागा लढवत केवळ ९ जागांवर यश मिळवलं. तर ४ जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादीला अवघी १ जागा मिळाली. राष्ट्रवादीची कामगिरी समाधानकारक नाही. शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला आहे. त्यामुळे भाजप शिंदेसेनेसोबतची युती कायम राखून दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडू शकतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनं भाजप, राष्ट्रवादीच्या युतीवर टीका केली. राज्यात स्थिर असताना राष्ट्रवादीसोबत युती करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करण्यात आला. विशेष म्हणजे संघाकडून टीका होत असताना भाजपच्या एकाही बड्या नेत्यानं ठोस भूमिका घेतली नाही. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरत असताना भाजप, सेनेचा एकही नेता हजर नव्हता. त्यामुळे भाजपनं राष्ट्रवादीची साथ सोडण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते राष्ट्रवादीपासून अंतर राखू लागले आहेत